गवताच्या अतिशय बारीक पात्यावर होणाऱ्या गणरायाच्या दर्शनासह धान्याचे दाणे, खडू यावर देखील मंगलमूर्तीचे दर्शन घडते. चांदी, पितळ, तांबे, लोखंड, काज, ग्रॅनाईट, लाकूड, फायबर, मोती, शिंपले, रुद्राक्ष इतकेच नव्हे तर पेन्सिल, साबण, शर्टची बटने अशा विविध वस्तूंवर अतिशय सूक्ष्म स्वरूपापासून ते सहा फूट उंचीपर्यंत असणाऱ्या सुखकर्त्याचे दर्शन मेळघाटात चिखलदरा लगत असणाऱ्या मोथा या ठिकाणी गणपती संग्रहालयात घडते. मेळघाटात वर्षभर येणाऱ्या लाखो पर्यटकांसाठी हे गणपती संग्रहालय खास पर्वणीच ठरत आहे.