गवताच्या अतिशय बारीक पात्यावर होणाऱ्या गणरायाच्या दर्शनासह धान्याचे दाणे, खडू यावर देखील मंगलमूर्तीचे दर्शन घडते. चांदी, पितळ, तांबे, लोखंड, काज, ग्रॅनाईट, लाकूड, फायबर, मोती, शिंपले, रुद्राक्ष इतकेच नव्हे तर पेन्सिल, साबण, शर्टची बटने अशा विविध वस्तूंवर अतिशय सूक्ष्म स्वरूपापासून ते सहा फूट उंचीपर्यंत असणाऱ्या सुखकर्त्याचे दर्शन मेळघाटात चिखलदरा लगत असणाऱ्या मोथा या ठिकाणी गणपती संग्रहालयात घडते. मेळघाटात वर्षभर येणाऱ्या लाखो पर्यटकांसाठी हे गणपती संग्रहालय खास पर्वणीच ठरत आहे.
अमरावती सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मेळघाटच्या जंगलात शंभर दोनशे नव्हे तर चक्क सहाहजारच्या वर गणपती बाप्पांच्या विविधरूपातील,स्वरूपातील आणि आकारातील गणपती विश्व् हे अकोला येथील प्रदीप नंद आणि दीपाली नंद या दांपत्याने साकारले आहे. प्रदीप नंद वडिलोपार्जित शेती व्यवसाया सोबतचं मालमत्ता खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. हे सर्व सांभाळून त्यांनी अगदी लहानपणापासूनच गणपतीच्या विविध मूर्ती जमाकरण्याचा छंद जोपासला. लग्नानंतर प्रदीप नंद च्या छंदाला पत्नी दीपाली नंद यांची पण साथ मिळाली. घरामध्ये हजार ,दोन हजार गणपती जमा झाले. घरातील सर्वच खोल्यामध्ये ,शेतात ,मित्रांकडे सगळीकडे गणपती च गणपती जमा झाले. आई माधुरी नंद ,वडील मधुसूदन नंद यांनी प्रदीप ला वारंवार सांगितले इतके गणराया जपले आहेत तर यांचा कुठेतरी संग्रहालय बनव. लागलीच प्रदीप व दीपाली ने संग्रहालय साकारण्याचा निर्णय घेतला.
संपूर्ण भारतासह परदेशात जेथे कुठे वेगळ्या स्वरूपाचे गणपती मिळतील ते या दांपत्याने सातत्याने जमा केले. ३००० च्या वर गणपती जमा झाल्यावर या दोघांनी गणपती संग्रहालय साकारण्याचा निर्णय घेतला .चिखलदरा येथे नंद यांची बऱ्याच ठिकाणी जमीन असल्यामुले पर्यटकांना गणेश दर्शन होईल हा उद्देश ठेऊन घनदाट जंगल परिसरात , निसर्गाच्या कुशीत तीन एकर जागेत अतिशय सुंदर असे गणपती संग्रहालय २०२० मधे साकारण्यात आले . सुरवातीला या ठिकाणी तीनहजार गणपती होते . आता संग्रहालयात सुंदर ,रेखीव मुर्त्यांची संख्या सहाहजारा वर पोहोचली आहे.
विदर्भाचे नंदनवन असणाऱ्या चिखलदरा येथे निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना चिखलदरा परिसरातच असणारे गणपती संग्रहालय पाहून मंत्रमुग्ध होतात .दक्षिण भारतातील मंदिरांना असत तस भव्य आणि आकर्षयक प्रवेशद्वार या संग्रहालयाचे आहे . संग्रहालयाचा परिसर व गणपतीचे विश्व् पाहतांना प्रत्येक व्यक्ती थक्क होतो .
आपल्या व्यवसायाच्या निमित्याने प्रदीप नंद मित्रांसोबत भारतभर फिरत असतांना काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत आणि गुजराथच्या किनाऱ्यापासून ते आसाम ,वाराणसी ,ओरिसा राजस्थान ,केरळ ,कर्नाटक बंगाल ,येथे असणाऱ्या विविध रूपातील गणपतीच्या मुर्त्या त्यांनी खरेदीकेल्या आणि या संग्रहालयात सुसज्जपणे मांडल्या आहेत . संग्रहालयात भारतातील विविध भागासह चीन.इंडोनेशिया ,नेपाळ ,भूतान ,थायलंड सिंगापूर सारख्या देश्यामध्ये असणाऱ्या विविध स्वरूपातील गणपतीच्या मूर्ती देखील आणण्यात आल्या काच ,माती,दगड,लाकूड ,फायबर अश्या विविध माध्यमात बनविलेल्या गणेश मूर्ती या संग्रहालयात पहायला मिळतात . गणपतीची नाणी ,गणपटूंच्या चौसष्ठ कला , अगदी बाळ गणेशापासून पासून भव्यदिव्य स्वरूपातील गणपतीचे दर्शन या संग्रहालयात घडते . क्रिकेट ,हॉकी .कबड्डी ,बुद्धिबळ ,बॅडमिंटन ,टेबलटेनिस ,खोको ,वाहन चालवतांना , शेती काम काम करतांनाचे गणवेश देखील पर्यटकांना आकर्षित करतात . त्याच प्रमाणे विविध वाद्य वाजवतांनाचे गणपती , २६ हजार पेन्सिली पासून बनवलेले गणेश तर पर्यटकांना भारावून टाकतो .